नोव्हेंबर महिन्यात तीन तारखेला ‘राष्ट्रीय गृहिणी दिवस’ आणि एकोणीस तारखेला ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस’ असे महिला आणि पुरुष दोघांचे कौतुक करणारे दिवस साजरे करण्यात येतात. हे असे वेगवेगळे दिनविशेष साजरे करण्यामागील मुख्य हेतू हा त्या व्यक्तींचा, विषयाचा सन्मान व कौतुक करणे, त्यांचे महत्त्व जाणणे हा असला तरी या निमित्ताने सदर विषयाची सद्य स्थिती, कालपरत्वे त्यात झालेले चांगले वाईट बदल, भेडसावणारे प्रश्न, त्यावरील उपाययोजना आणि पुढील वाटचालीचा एक साधारण नकाशा या बिंदुंवर अभ्यास होणे देखील अपेक्षित असते. म्हणूनच नोव्हेंबर महिन्यातील राष्ट्रीय गृहिणी दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस या दोन्ही खास दिवसांच्या निमित्ताने आपल्या समाजातील कुटुंब व्यवस्था, त्यातील गृहिणींचे स्थान, त्यांचे महत्त्व, आधुनिक विचार आदी अभ्यासण्याचा हा प्रयत्न.
या विषयाचा विचार करू लागले आणि माझ्या परिचितातील कितीतरी गृहिणी व गृहस्थांच्या आठवणी मनात पिंगा घालू लागल्या. वयाच्या सत्तरी पंचाहत्तरीलादेखील सर्व नातेवाईकांच्या, पाहुण्या-रावळ्यांच्या आवडी लक्षात ठेऊन त्यानुसार छान छान पदार्थ बनवणारी माझी अन्नपूर्णा आजी आणि डोक्यावर काळी टोपी, पांढरं शुभ्र धोतर घालणारे, करडी नजर असलेले कडक शिस्तीचे माझे आजोबा, आपल्या पतीच्या चहा पाण्यापासून ते इस्त्रीच्या कपड्यांपर्यंत सगळं अगदी वेळशीर तयार ठेवणाऱ्या माझ्या सासूबाई तर सकाळी वर्तमानपत्र वाचत नातवंडांना सहजतेने त्यातील माहिती सांगणारे माझे सासरे, दररोज गंध फुलांनी आपल्या देवांना सुंदर सजवणाऱ्या, नित्यनेमाने उपासतापास करणाऱ्या आमच्या ताईकाकू, आजी आजोबांचं सगळं आजारपण न कुरकुरता शांतपणे काढणारी माझी आई, कामाचा कितीही धबडगा असला तरी गॅलरीमध्ये येणाऱ्या चिमण्यांसाठी न विसरता दाणे पाणी ठेवणारी वहिनी आणि तिच्या आवडीची सोनचाफ्याची फुले देणारा दादा, सुब्बलक्ष्मींचं सुप्रभातम् ऐकत स्वयंपाकपाणी,सकाळीची सर्व कामं भराभर उरकून महाविद्यालयात शिकवायला पळणाऱ्या आमच्या शेजारच्या काकू, कापडमिल बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेल्या व दारूचं व्यसन लागलेल्या आपल्या नवऱ्याला आवडतं म्हणून जेवायला ‘वशट’ बनवून देणाऱ्या आमच्या सखू मावशी, कानात ब्ल्यूटुथ लाऊन मीटिंग्स करत करत मुलाला क्लासेसना घेऊन जाणारी माझी धाकटी बहीण, मला घरात बरोबरीने मदत करणारा माझा नवरा आणि आम्हाला मुलबाळ नको आम्ही दोघंच लाइफ मस्त एंजॉय करणार आहोत असं म्हणणारी ‘डिंक’ (Double Income No Kids) विचाराची माझी भाची....एक ना दोन अनेक जण डोळ्यासमोर आले. आणि लक्षात आलं आजी आजोबांपासून ते भाच्यांपर्यंतच्या या प्रवासात गृहिणी आणि गृहस्थाच्या भूमिका किती बदलत गेल्या आहेत. या सगळ्यांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक ठेवण वेगळी. पद्धती वेगळ्या. मात्र त्यांच्यातील साम्य म्हणजे सगळेच आपलं घर, मुलं, संसार, कुटुंब सांभाळत आहेत...कष्टाने, शिस्तीने, निगुतीने, सोशीकतेने, धाकाने, हिमतीने, आनंदाने, समजुतीने, समाधानाने, उत्साहाने एकमेकांना जपत आहेत.
भारतीय समजव्यवस्था-
सहस्त्रावधी वर्षांची परंपरा असलेली आपली संस्कृती. या हजारों वर्षात कितीतरी सामाजिक, राजकीय, वातावरणीय बदल स्वीकारत उत्क्रांत होत गेलेली; अनेक परकीय आक्रमणे पचवून आपलं स्वत्व टिकून ठेवणारी; आर्थिक, सामाजिक, भाषिक व पारंपरिक विविधता असलेली आपली संस्कृती. आज जी समाजरचना आपल्याला दिसते त्यावर हजारो वर्षात झालेल्या या बदलांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. कालौघात बॅबिलिओन, रोमन, इजिप्तशिअन अशा बऱ्याच संस्कृती जन्मल्या आणि नष्टही झाल्या मात्र सनातन भारतीय संस्कृती आजही आपले मूळ जपत आणि नवबदल स्वीकारत कैक वर्ष टिकून आहे. याच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे आपली सशक्त कुटुंबव्यवस्था. भारतीय समाजव्यवस्थेत कुटुंब पद्धतीचे विशेष महत्त्व आहे. या कुटुंबव्यवस्थेचे दोन मुख्य आधार गृहिणी आणि गृहस्थ.
निसर्गाने निर्मितीची क्षमता स्त्रियांकडे दिली आहे. आदिम मानव स्त्रियांच्या या मातृत्वशक्तीपुढे नतमस्तक झाला. नवनिर्मिती करू शकणारी ही शक्ती पुरुषाकडे नाही, ही सर्जनशीलता केवळ स्त्रीकडे आहे हे पाहून त्याने जीवनव्यवस्थेचे केंद्र मातृत्व मानले. यामुळे आदिमकाळात सुरुवातीला अनेक ठिकाणी मातृसत्ताकपद्धती निर्माण झाली. आदीमानवाला हळूहळू लक्षात आले की सर्जनाच्या प्रक्रियेत ‘स्त्रीतत्व’ जसे प्रत्यक्षपणे क्रियाशील असते तसेच ‘पुरुषतत्व’ देखील बीजरूपात अप्रत्यक्षपणे सहभागी असते. यामुळे मातृसत्ताक जीवनव्यवस्थेमध्ये पुरुषतत्वाचे महत्त्व देखील वाढू लागले. ‘आदिमायेचे पूजन करणाऱ्या आदीमानवाने शिव आणि शक्ती दोघांना दैवत्व दिले. आपल्याकडे गौरी-शंकर, लक्ष्मी-विष्णू अशा दैवी दांपत्यांची संकल्पना रूजली. स्त्रीला निसर्गाकडून मिळालेल्या मातृत्व भावनेच्या देणगीमुळे कुटुंबाचे संगोपन स्त्रियांकडे आणि पुरुषांच्या निसर्गतः असलेल्या काहीश्या राकट स्वभाव वैशिष्ठ्यांमुळे बाहेरील जबाबदाऱ्या पुरुषांकडे अशी साधारणतः समाजव्यवस्था होत गेली. संसाराचा रथ सुरळीत चालण्यासाठी, सामाजिक व्यवस्थेची सुव्यवस्थित चौकट बसविण्यासाठी गृहिणी आणि गृहस्थ या दोघांच्या जबाबदऱ्या वाटल्या गेल्या. वंशवृद्धी, कुटुंबाचे संगोपन, सशक्त व सुसंस्कारित समाज निर्माण ही जबाबदारी स्त्रियांकडे तर आर्थिक उन्नती, समाजाचे संरक्षण व स्थैर्य ही जबाबदारी पुरुषांकडे अशी कामांची विभागणी झाली. मात्र आपल्या सनातन विचारात ही विभागणी एकमेकांना तोडणारी, एकमेकांच्या विरुद्ध किंवा विषम नव्हती. तर ती परस्परपूरक होती. परिपूर्ण समग्र जीवनासाठी केलेली ही व्यवस्था होती.
परस्परपूरक असे शिव आणि शक्ती-
भारतीय दृष्टिकोनातून स्त्रीला कसे पाहिले आहे याचा जर अभ्यास शिव आणि शक्ती या संकल्पना समजल्याशिवाय अपूर्ण आहे. शिव आणि शक्ती ही द्वैत भावात सहजीवन रेखित करणारी सुंदर संकल्पना. किंबहुना, भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वाधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि विश्वात्मक अशा संकल्पनांमध्ये “शिव” आणि “शक्ती” यांचा समावेश होतो. ही केवळ देव-देवतांची पूजा नसून विश्वाच्या संरचनेचे, चेतनेचे आणि ऊर्जा-प्रक्रियेचे वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानधिष्ठित स्पष्टीकरण आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार विश्वाची निर्मिती, स्थिती आणि लय या तिन्ही प्रक्रिया शिव-शक्तीच्या अखंड संयोगातून घडतात. ‘शक्तीशिवाय शिव जड, शिवाशिवाय शक्ती दिशाहीन’. एकात्मता, समत्व, पूरकत्व, समतोल, सहजीवन, याचे किती चपखल उदाहरण. शिव आणि शक्ती दोघेही समान महत्त्वाचे. ज्या संस्कृतीमध्ये स्त्रीत्वाला शक्तीरूप मानले शिव आणि शक्ती ही ज्या संस्कृतीचे मूलतत्व आहे त्या समाजात गृहिणी कमकुवत व बंदिस्त असूच शकत नाही.
भारतीय दृष्टिकोणातून गृहिणी-
भारतीय समाजव्यवस्था ही व्यक्तिनिष्ठ नसून समाजनिष्ठ आहे. व्यक्तीच्या विकासाकडे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी अशा व्यापक टप्प्यातून आपण पाहतो. पाश्चात्य सभ्यता आणि भारतीय संस्कृती यातील हा अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. आपल्याकडे प्रत्येक बिंदुला समाजाच्या आणि संपूर्ण सृष्टीच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पाहिले जाते. यामुळेच आपल्या समाजव्यवस्थेचे ध्येय शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सुसंस्कृत व तत्वनिष्ठ व्यक्ति व समाजनिर्माण हे आहे. गृहिणी आणि गृहस्थाच्या जबाबदारींची चौकट देखील याच दृष्टीने रचली गेली.
नैसर्गिक स्वभावगुणधर्मानुसार झालेल्या जबाबदाऱ्यांच्या वाटणीतून गृहस्थ आणि गृहिणी या संकल्पना आल्या. गृहिणी आणि गृहस्थांच्या जबाबदारींविषयी, त्यांनी कसे आचरण करावे या संबंधी वेगवेगळे श्लोक व संदर्भ आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये दिसतात. गृहिणीचे वर्णन करणारा एक श्लोक आहे.
“गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते।
गृहं तु गृहिणीहीनमरण्यसदृशं मतम्॥“
घर हे घरातील गृहिणीमुळे ओळखले जाते. भारतीय कुटुंबव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणजे ‘गृहिणी’. गृहिणीशिवाय घर एखाद्या जंगलाप्रमाणे होते. केवळ दगड विटांनी घर बनत नाहीत तर त्या चार भिंतींना गृहिणी खऱ्याअर्थाने घरपण येतं. भारतीय विचार सांगतो, स्त्री ही सृष्टीची निर्माती आहे; तिच्यात सर्जन, संयम, करुणा आणि निर्णयक्षमता यांचा संगम आहे. गृहिणी ही या शक्तीची सजीव प्रतिमा आहे. त्यामुळे मातृत्व, प्रेम, संगोपन करणारी स्त्री ही कुटूंब व्यवस्थापनाची जबाबदारी पाहू लागली. घर सांभाळणे म्हणजे कमीपणाचे आपण कधीच मानले नव्हते. उलट उत्तम व्यक्तीनिर्माण झाले नाही तर उत्तम समाज निर्माणच होऊ शकणार नाही आणि समाजनिर्माणाचे महत्त्वपूर्ण कर्तव्य गृहिणीचे आहे.
कालपरत्वे झालेले बदल-
आदर्श स्वरूपात पाहिले तर पुरुष आणि स्त्रियांमध्ये केलेली ही कामाची वाटणी समाजव्यवस्था सुरळीत बसवण्यासाठी योग्यच होती. मात्र कालपरत्वे या मूळरचनेत अनेक कारणांमुळे काही चांगले तर काही वाईट बदल झाले. हळूहळू पुरुषप्रधान संस्कृतीची वीण घट्ट होत गेली. परकीय आक्रमणांमुळे संरक्षणार्थ महिलांना अधिकच घरात, बंदिस्त वातावरणात रहावे लागले. घरकामात प्रत्यक्ष अर्थाजन नसल्याने गृहिणीचे महत्त्व कमी होत गेले. ‘कमावते’ असल्याने पुरुषी अहंकार वाढीस लागला. व्यक्तीनिर्माण हे महत्त्वाचे नसून अर्थाजनच जास्त महत्त्वाचे ही परकीय विचारसरणी रुजू लागली. आणि मग हळूहळू गृहिणी म्हणजे केवळ चूल आणि मूल सांभाळणाऱ्या असा विचार वाढला. स्त्रियांचा गृहस्वामिनी हा मान जाऊन त्या ‘काही करत नाही घरीच असतात’ ही मानसिकता रूजली. दुर्दैवाने गार्गी, मैत्रेयीच्या या भूमीत ‘गृहिणी’ या शब्दाला बंदिस्त, कैद, गुदमरलेला श्वास असा रंग मिळाला.
आज भारतीय कुटुंबप्रणालीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. काहींचं म्हणणं आहे की, “गृहिणी” या भूमिकेत भारतीय स्त्रीला स्वातंत्र्य नाकारलं गेलं. तिला चार भिंतींत कैद करून ठेवण्यात आलं. गृहिणी या संकल्पनेला आपल्या मूळ समाजव्यवस्थेमध्ये जो मान होता तो गेल्या काही शतकांमध्ये अनेकांच्या मनातून कमी झाला आहे हे वास्तव आहे. अनेक पुरुष स्त्रियांना त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचे मानतात हे ही खरे आहे पण हा दृष्टीकोन अर्धसत्य आहे. किंबहुना आपल्या संस्कृतीची ठेवण लक्षात न घेता पाश्चात्यांच्या मापदंडातून व्यक्त झालेले हे मत आहे.
पाश्चिमात्य विचार-
पाश्चिमात्य समाजरचनेपेक्षा आपली व्यवस्था वेगळी आहे. पश्चिमेत व्यक्तिवाद हा केंद्रस्थानी ठेवून सामाजिक रचना विकसित झाली, तर भारतात ती “समाज केंद्रित” आहे. पाश्चिमात्य औद्योगिक समाजात “हाऊसवाइफ” ही भूमिका तयार झाली. आर्थिक व्यवस्थेला जास्त महत्व असणाऱ्या त्या समाजात घरकामाला आर्थिक महत्त्व नसल्याने हाऊसवाइफला कमी मान होता. आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानतो. केवळ अर्थ किंवा केवळ मोक्ष महत्वाचे नाही तर दोन्ही महत्त्वाचे.त्यामुळे आपल्याकडे पैसे कमावणे हे एक कर्तव्य आहे केवळ तेच महत्त्वाचे नाही. याच विचारसारणीतील फरकामुळे गृहिणी आणि हाऊसवाइफ वेगळ्या आहे.
भारतीय संस्कृतीची ‘गृहिणी’ ही संकल्पना पाश्चिमात्य हाऊसवाइफ संकल्पनेपेक्षा जास्त व्यापक आहे.. आपण गृहस्थ आणि गृहिणी धर्म मानतो. सोप्या शब्दात सांगायचे तर आपल्यासाठी आपले कर्तव्य म्हणजे आपला धर्म. मातृधर्म, पितृधर्म, शेजारधर्म या आपल्या संकल्पना आहेत.
“कर्तव्ये एव हि पुरुषाणां भगवत्याः आराधनं।”
(कर्तव्याचं पालन म्हणजेच दिव्यतेची उपासना.)
असा विचार मांडणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये गृहिणीत्व हा स्त्रीचा धर्म होता. कुटूंबाचे संगोपन हे कर्तव्य करताना ती कमी नव्हती. त्यामुळेच हाऊसवाइफ केवळ घरात राहणारी स्त्री असेल पण गृहिणी ही सुसंस्कृत व्यक्तिनिर्माण करणारी आहे, समाजनिर्माती आहे. पाश्चात्य देशांमध्ये एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात घराच्या चौकटीत अडकलेल्या स्त्रिया मोकळा श्वास शोधू लागल्या. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की मग क्रांती होते. स्त्रीस्वातंत्र्याबाबत पुनर्विचार होऊ लागला. स्त्रीवादी विचार मूळ धरू लागला. ग्लोरिया स्टायनेम, एमेलिन पंकहर्स्ट, सीमॉन बोव्हा यांसारख्या नवस्त्रीवादी विचारांच्या समाजसेविकांनी वैचारिक मंथन घडवले. “स्त्रीपण हे नैसर्गिक नसून पुरुषी वर्चस्व असलेल्या समाजव्यवस्थेने स्त्रियांवर ते लादलेले आहे.” असे मत प्रसिद्ध फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी लेखिका सीमॉन बोव्हा यांनी मांडले. गेल्या १०० वर्षात या नवस्त्रीवादाला बळकटी आली. महिला घराबाहेर पडल्या आहेत, सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. आर्थिक स्वावलंबन आले. मात्र दुर्दैवाने पूर्वी झालेल्या अन्यायी व्यवस्थेच्या विरोधात चालू झालेला आधुनिक स्त्रीवादाचा प्रवास देखील आता अतिरेकाकडेच जात आहे असे म्हणावे लागेल. पुरुषसत्ताक व्यवस्थेपासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या नादात नवस्त्रीवादी महिला पुरुषांबरोबर बरोबरी करण्याचा प्रयत्न करू लागल्या. आपण पुरुषांपेक्षा कमी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करताना स्त्री ही मूलतः स्वतंत्रच आहे, निसर्गाने पुरुष आणि स्त्रीला भिन्न प्रकृतीचे बनवले आहे, बरोबरी करणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे हेच नवस्त्रीवादी महिला विसरल्या.
सद्य भारतीय परिस्थिती-
भारतात पाश्चात्य देशांपेक्षा परिस्थिती निराळी आहे. भारतीयांवर आपल्या सनातन संस्कृतीचा प्रभाव आहे पण इंग्रजांमुळे व नवयुगातील बदलांमुळे भारतीय स्त्री गोंधळली आहे. कुटूंब सांभाळण्याची जबाबदारी ही स्त्रीची ही मनात घट्ट बसलेली प्रतिमा आणि बाहेर पडून मिळालेले स्वातंत्र्य यात एक ताण निर्माण होऊ लागला. यातून एक मानसिक द्वंद्व सुरू झाले. आज घराबाहेर पडून अर्थाजन करत घर सांभाळणारी स्त्री ही समाजाची नायिका आहे. ती ‘सुपर वुमन’ आहे. सुपर वुमनची तारेवरची कसरत करणाऱ्या स्त्रीसमोर ‘घर सांभाळणारी गृहिणी’ या संकल्पनेला कमी लेखलं जाऊ लागलं आहे.
आदिमकाळातील मातृसत्ताक संकल्पनेपासून सुरुवात झालेला हा प्रवास पुढे गृहस्वामिनी, गृहिणी, घरातच राहणारी, असा मर्यादित होत गेला. त्यानंतर पुन्हा गृहिणीपदाबरोबरच पैसे मिळविण्यासाठी बाहेर पडणारी, घर आणि कार्यालयीन जबाबदारी दोन्ही सांभाळणारी सुपर वुमन आणि आता घर आणि बाहेर या दोन्ही डगरींवर पाय न ठेवता आपलं स्वतंत्र अस्तित्वच जपणं जास्त महत्त्वाचं असं मानणारी आधुनिक स्त्री इथवर हा प्रवास आला आहे.
खरं तर गृहिणी या शब्दाची ताकद फार मोठी आहे. आधुनिक व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर समयव्यवस्थापन (time management), मानवी संबंध (Human welfare), संसाधनांचा वापर (resource management), संघर्षनिवारण (crisis management), नेतृत्व (leadership), आर्थिक नियोजन (value optimization) या सर्व गुणांचा संगम एका गृहिणीमध्ये दिसतो. ती घरात हे सर्व सहजतेने एकहाती सांभाळत असते. कुटूंब व्यवस्था सशक्त असेल तर समाज सशक्त घडतो. गृहिणी ही कुटूंब व्यवस्थापनाचा कणा असल्याने समाजनिर्मितीमधील तिची भूमिका ही अनन्यसाधारण आहे. राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, साने गुरुजींच्या आई यशोदाबाई साने अशी किती तरी वंदनीय गृहीणींची उदाहरणे देता येतील ज्यांनी आपलं स्त्रीत्व जपत, कौटुंबिक कर्तव्ये उत्तम रीतीने पार पाडून एक सशक्त गृहिणी काय करू शकते याचे आदर्श आपल्या समोर ठेवले आहेत. आपलं साम्राज्य वाचवण्यासाठी तान्ह्या बाळाला पाठीवर घेऊन तलवार गाजवणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंचा जन्मदिवस ही याच महिन्याच्या १९ तारखेला असतो. एक उत्तम गृहिणी आणि एक उत्तम राज्यकर्ती या दोन्हींचा संगम असलेल्या राणी लक्ष्मीबाई. खरे तर या महनीय स्त्रियांचा आदर्श समोर असताना भारतीय स्त्रीने गोंधळून जाण्याचे कारणच नाही.
मुळात भारतीय विचारधारा पाश्चिमात्य विचारसरणीपेक्षा फार वेगळी आहे. भारतीय समाजव्यवस्थेला पाश्चिमात्य मोजपट्टीमध्ये बसवून जोखणे हे अयोग्य ठरेल. गृहिणी या संकल्पनेला आज ज्या दृष्टीने पहिले जाते तिथे हीच गल्लत होत आहे. पाश्चात्य समाजात freedom म्हणजे व्यक्तीची स्वतंत्र इच्छा तर भारतात स्वातंत्र्य म्हणजे जाणीवपूर्वक जबाबदारीचं पालन. द्रौपदी, लोपामुद्रा, मैत्रेयी सारख्या तेजस्वी स्त्रिया ज्या संस्कृतीत आहेत त्या संस्कृतीने पश्चिमात्यांचे अंधानुकरण का करावे? मधल्या काळात आपल्या समाजात काही चुकीचे मतप्रवाह, महिलांसबंधी अन्यायकारक वातावरण बनलं असेल पण आपल्याला ते बदलायचं आहे. आपलं स्वत्व विसरून केवळ अंधानुकरण करायचं नाही. एवढ्या वर्षात रुजलेल्या काही चुकीच्या परंपरा, रूढ झालेले अयोग्य मतप्रवाह दूर करून आपल्या मूळ संस्कृतीला अनुसरून गृहिणीत्व परत जपलं तर आज दिसणारा मानसिक गोंधळ दूर होईल.
गृहस्थ आणि गृहिणी हे दोघेही संसार रथाचे दोन चाक आहेत आणि दोघांच्या समतोलातूनच समाजव्यवस्था सुरळीत चालेल. आदी शंकराचार्यांच्या सौंदर्यलहरीतील पहिला श्लोक सर्व स्त्रियांनी निश्चित विचारात घ्यावा.
“शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं
न चेत्तां देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि।
अतस्त्वामाराध्यां हरिहरविरिञ्चादिभिरपि
प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति।”
म्हणजे शिव शक्तीने युक्त असेल तरच तो सृष्टी निर्माण करू शकतो. जर तो शक्तीशिवाय असेल, तर तो हालचालही करू शकत नाही. "म्हणूनच, ज्याच्याकडे पुरेसे पुण्य नाही, तो तुझ्या (देवीच्या) अशा आराध्याची पूजा कशी करू शकतो, ज्याची पूजा हरि, हर आणि विरिंचि सारखे देवसुद्धा करतात.
भारतीय समाज स्त्रीयांकडे किती उदात्तदृष्टीने पाहतो हे समजण्यासाठी अजून दूसरा कोणता श्लोक योग्य असेल. आपल्या समाजाला सीमॉन् बोव्हाच्या नवस्त्रीवादाचा नाही तर आदी शंकरचार्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज आहे, आपल्या मुळांकडे परत जाण्याची गरज आहे.
-गौरी सुमंत-डोखळे